शाणकेची मोगरू

भांगरभूंय | प्रतिनिधी

म्हस एकसारखी रेकसे. एवढ्या अपरात्री?, आपण स्वप्नात सां का प्रत्यक्षात आईकसा हे शाणकेकाकाचे लक्षात आयला नाय.
हांतरुणावेल्लो खडबडनी उठलो. वरा बगे घड्याळ से कोणाकडा ? पडव्यावर आयलो नळभात बघला. चंद्र मावळतीला गेलेलो. पहाट हत आयलेली. काकाची जाग गावली तशी म्हस नेटानं रेकू लागली. म्हस रेकसे ता आयकोनी रेडुक पण रेकू लागला. रात्रभरी उपाशी सला. तेला पण दुधाची तलप आयलेली. काकान म्हशीला न्हेवनी गोठेत बांधली. परत येवनी घुसपट मारनी निदावलो. काकाची पाठ हसे मात्र, म्हशीन परत रेके सुरवात केली. किताला म्हस रेकसे, म्हणी गोदुकाकी जागी जाली. काकाला विचारलान, `म्हस मगातपाश्णी रेकसे, चला बघा जावनी’.
‘वाग खाव त्याला. निक्ती बांधनी आयलॉसा’. असा म्हणत तकल्यावेल्या गोदडी ओडनी निदवलो. संध्याकाळां म्हस आयली नतली. दूध ओट्याला उरला. ओटी सणसणु लागली हे काकीचे लक्षात आयला. म्हणसे म्हणीसर रेडुक परत रेकू लागलां. काकी उठली ती सरळ गोठेत गेली. म्हशीला बरी माकुळली, खायवे करड घातला. ‘रात्री पाश्णी तुजा रेडुक उपाशी से. तां फक्त दोन म्हायनेचा से, तेल भूक लागली से. हेची माततरी काळजी से का तुला ? चरे गेलीस ती ऱ्हेली तेगडा फिरत ? एतां ओट्याला तडस लागली तशी आयलीस ? ऱ्हे एतां मातशी. येसां तामयो घेवनी.’ असा म्हणत काकी घरात आयली. काकी आपलेला तापयसे तां आयकोनी म्हस काकीला बघित ऱ्हेली. खुप भाऊक जाली. विचार करू लागली.
‘माला माजे रेडकावर माया सेच, शिवाय हे घराणेवर माया सेच. माजे शरीरात जास्त प्रमाणात दूध तयार हवं लागला से. म्हणी माला खूप भूक लागसे. म्हणी पोटभरी खायवेवा लागसे. दिवसभरी चरेवां लागसे. चरो भरपूर हवो जाले दूर मळावर जायवेवां लागसे. हे तुला कसा कळेल. लागीलागसार चरे लोकांचे ढोरांनी कितां माती थेयलासे ? सगळी मळां खड्डुनी उडयली सत. हे तुमला क्यें खबर से ? रेडुक उपाशी उरला, चहाला दूध नाय दही लोणी तूप नाय, वांयगणाला अणि कुळागराला घाले शेण नाय इतकाच तुमला पडला से. दावेवर ऱ्हेव्वेची मला सवय नाय. आपला पॉट आपण भरेचा. आयता खायवेचा नाय. माजे खाणाला तुमचो खर्च वाढवेचो नाय. हो माजो स्वभाव से. म्हणी माला गोठेत येव्वे उशीर हसे. पण तुमला हे क्यें कळसे. सद्दानी वेळावर येसां तेडला माजा कौतुक कोण करीत नाय. एक दिवस जर का उशिरा आयल्या तर बोवाळ घालसा, गाळी घालसा, मारसा, बडयसा. पण में काहीच म्हणत नाय. वाईट दिस्से. पण कितां करू ? कोणाला सांगो ? एक एक दिवस असो राग येसे म्हणी सांगो ! मोग मे दूध देत नाय. मोग तुमी लाथो बांधनी दुध काडसा मारसा. मला इच्छासे का नाय हेंचो विचार करीत नाय तुमचो स्वार्थ तितकोच बघसा. सों, माजां कर्तव्य मे करसां.’ इतके सगळे विचार मोगरुचे मनात घोळसत तोपर्यंत काकी रेडकला अणि तांबयो घेवनी दूध काडे आयली.
काकीन दूध काढला अणि रेडकाला लुचे सोडला. इतका करसे म्हणीसर दिसो लागलेला. काका पाटावर जावनी तोंड धवनी, प्रातविधी आटपुनी आयलेलो. ताजे दुधाची बऱो चाहा घेतलो. गोठेत गेलो. मोगरून काकाकड बघितला सुद्धा नाय. एरवी काका गोठेत गेलो की मोगरू तेला चाटीत सली. काकांचे लक्षात आयला, आज मोगरूला माजो राग आयलो से. मोगरुचे पाठीवल्या हात फिरयलो, रेडकाला गोठल्यात घातला, शेण भरनी हातपाय धोव्वे गेलो. आज मोगरूला दावेवर बांधनी थेयणार, माती काय खायवे घालेचो नाय. असो विचार करीत घराशी आयलो. आमची दुधाची धांदल करसे ती करसे. ते रेडकाची बी धांदल करसे. असां मनातले मनांत.बडबडु लागलो.
काकी आपली कामा आटपुनी न्हायवे गेली. रांदप करनी सगळेना जेव्वे वाढलान. आपण जेयली. उश्टा खरकटा आवरला. अणी लिपोणी थेवे गोठेत जासे जाले मोगरु दावेवर. लिपोणी मोगरुचे पुढेत थेयली. आज हेंचेनी राग म्हशीवर काडलो. असा म्हणत घरात आयली. ” म्हशीला बांधनी थेयलीसा ती उध्या दूध देव्वेची नाय. फिरोनी, चरोनी पॉट भरनी आयली तर दूध देनार हे खबर सताना त्याला की म्हणी बांधनी थेयलीसा ? ती बाबडी मनजात त्याला कितां कळसे ? आपला पॉट आपण भरनी येसे. म्हणी दोन शेर दुध देसे. मुके जनावरावर कसले राग करसा ? असा म्हणत, कोयती घेवनी काकी कुळागरात सुटली.
येताना केळीची सोपा, फाळे, पवल्यो, सरपटी, अणि गुळूलो घेवनी आयली. गुळूलेची पेंडी रेडकाचे पुढेत बांधली. सोपा बारीक करनी म्हशील खायवे घातलीन. पौल्यांचे काने कातरुनी उरलेला कात्रण म्हशीला खायवे घातलान. संध्याकाळा दुध काडणी रेडकाला लुचयला. रात्रीचे जेवणांच्या तयाऱ्याला लागली.
म्हशीला दावेवर बांधनी पोसता येत नाय हे काकीला खबर सला. तेप्रमाण सद्दानी सोडनी घालीत सली. म्हणता म्हणता म्हयने गेले. म्हस पाडशी जाली. दूध कमी केला. म्हस फळे आयलेली. अणि देवाच्या कृपान फळली सुद्धा. काही दिवसांनी दूध बंदही केलां. ही गजाल आनंदाचीच सली. पण म्हस व्येय पर्यंत दुधाची सोय कशी करेची हो पण प्रश्नच सलो. नवीन म्हस घेणार तर आर्थिक दृष्ट्या शक्य नतला. दुधाशिवाय ऱ्हेणा पण शक्य नतला.
दूध बंद केले उपरांत शाणकेकाकान म्हशी कडा दुर्लक्ष केला. खरी गरज सली ती एतां. कारण म्हस गाबणी सली. पण काकीन मोगरूची कसलीच हयगय केलीं नाय. उलट जास्त काळजी घेवनी म्हशीकडा जास्त लक्ष देव लागली. कशीबशी दुधाची पर्यायी व्यवस्था केली. म्हस व्येनार ते दिवसाची काकी वाट बघीत सली. हे दोन दिवसात मोगरू व्येनार असो अंदाज आयलो. तेडला म्हशीला सोडनी घालेची बंद केली.
म्हस आज व्येल का उद्या म्हणी काकी जागरूक सली. रात्रीची अध्यामध्या गोठेत जावनी येत सली. नेमकी मध्यांनरात्री मोगरू व्याली. हे खेपा बी रेडुकच घातलांन. काकी नेमकी त्याच वेळा गोठेत गेलेली. तशीच घरात आयली. काकाला उठयलो. ‘उठा लोक्कोर. मोगरू व्याली. रेडुक घातला से. रेडकाची गेळा खुटूंनी तेला पुसनी म्हशीचे पूढेत थेवा. आणि म्हशीला धवनी वार पडसे का बघित बेसा. मे मेथ्याची पेज शिजत थेय्सा. चला उठा लोक्कोर.’ इतका सांगोनि काकी घरात गेली.
काका निदातथींन उठलो. पाड पडो या म्हशींचा. निदवे सुद्धा वाट नाय. ह्याला व्येव्वे वेळ बरी गावली. असा म्हणत गोठेत गेलो. रेडकाला पुसला, गेळा काडली अणी म्हशीचे पुढेत बांधलां. म्हशीला धवली. वार लवकर पडे हवी म्हणी, खायवे कोंडची पालवी हाडनी घातली. वार कय पडसे ती बघे, त्याहाच बेसलो. मोगरूची नजर काकावर गेली.
आज में व्याल्यां. उद्या हेना खरवस खायवे गावनार. वर्षभरी दूध खायवे गावनार. दही ताक लोणी तूप भरपूर मिळनार. काका आज खुश जालो से. आज माझी चाकरी करे आयलो कारण तेंचो एतां वर्षभरी फायदो हनार. एक नंबर चो स्वार्थी. माणूस हो स्वार्थी प्राणी से. आमचा आपला बरा. स्वार्थ नाय अणी कांय नाय. निसर्ग नियमानुसार देत ऱ्हेव्वेचा. में दूध बंद केला तेडला पाश्णी माजी चाकरी केली नाय. आणि आज आयलॉसे माजी काळजी घेव्वे. फक्त स्वार्थ आणि फायदो.

अशोक नेने (स्वच्छंदि)
9423811778