माजे मनातलां ध्येय

भांगरभूंय | प्रतिनिधी

चित्पावनी बोली ही चित्पावन ब्राह्मणांना. तसाच इतर समाजाला ज्ञात हैवी/ शिकेवी असां मला मनोमन दिस्से. ही चित्पावन ब्राह्मणांची पूर्वजात बोली से, हि आमचेच समाजातले काही मंडळींना खबर पण नाय. म्हणी हे सगळेची जाणीव करनी देव्वेचो हो एक प्रयत्न केलो से.
में माझ्या जन्मा पाश्णी ही बोली बोलत अणी आयककत आयलो सां. ही माझी मातृभाषा (बोली ) से. म्हणी माला या बोलीचो अभिमान से. हे माजां मालाच कळे खूप उशीर जालो. अणि जेडला लक्षात आयलां तेडला, में सुरवातीला चित्पावनी लेखनाला सुरवात केली. अजूनी एक कारण म्हणजे माज्या बायलाला.अणी भुर्गेनां चित्पावनी बोलता येत नाय. ही खरी खन्त से. जसां म्हणसत की, दिव्याखाली अंधार. अगदी तसांच से. म्हणी चित्पावनीचो प्रचार, प्रसार अणि संवर्धन करेचां खरां कारण हेच ठरलां. अणि हेच कारण लक्षात घेवनी, में केंचेतरी चित्पावनी बोलीभाषा हे व्हॉट्सएप समूहात सामील जालो. पण काय अरिहार्य कारणामुळां माला समूह सोडेवो लागलो.
कालांतराने में , ‘अभ्यास चित्पावनी बोलीचा’ हे नावान स्वतंत्र असो व्हॉट्सएप समूह केलो, सुरवातीला प्रचंड प्रतिसाद लाभत गेलो. कालांतरान त्याहां पण गळती सुरू जाली. पण जे टिकले ते शिकले. माजो मूळ मंत्र असो सलो की, ‘चुकाल तरच शिकाल’. जे समूहातथीन बाहेर पडले तेंचेनी स्वताचा नुकसान करनी घेतलां. माजां कांयच नुकसान जालां नाय. कारण में शिकयणेसाठी कसलीच फी आकारीत नाय. अगदी विनामूल्य. आपलेकडा जां ज्ञान से तां समोरचेला वाटीत जायवां हे तत्वावर आज पर्यन्त कार्य चालू से.️ हे समूहात पाच सहा शिक्षकांनी शिकवे कंबर कसली, ती पण विनामूल्य. जे प्रयत्न ऐत्ता पर्यन्त जाले ते सफल जाले. कारण आठ ते दहा जण शिकले हेच मोठां माजेसाठी अणी माजे साथीदारासाठी. माला तर हे लोकांचो अभिमान से.
आज काल संस्कृत किंवा इतर भाषा शिके फी देवनी शिकसत. म्हणी ती बऱ्या पद्धतीन आत्मसात करसत. जां आपलेला फुकट मिळसे तेला किंमत नस्से. जां खर्च करनी शिकसत तां रोकडांच आत्मसात करसत. तेला किंमत ससे. ( किंमत म्हणजे values not in money. Your support is of great values ) कारण, we are paying for that. And if I want to recover my money I have to learn. या बेसिस वर शिकसत. जां विनामूल्य मिळसे तेला तेवढां महत्व नस्से. हे में फि चा महत्व सांगसां
सो, आमची चित्पावनांची जी बोली से, ती शिके उत्सुकता नसेवी. वेळ नसेवो. कारणां खुप सतील ! पण खरां कारण, आस्था नसेवी. बरोबर से. ह्या बोलिला तसो दर्जो नाय. में चित्पावनी शिकलो हेत मोठेपणा नाय. उलट मे जर्मनी, जापानी, फ्रेंच, चिनी शिकलो हेत मोठेपणा से. तरी चित्पावनीचो प्रचार अणी प्रसार करनी आपण दर्जो वाढवे हवो. कारण ही बोली आमची पूर्वजात बोली से. म्हणी ही बोली जास्तीतजास्त बोल्ली जाय्वी, लुप्त हत चायलेली बोली पुर्नजिवीत हैवी, म्हणी मे एक ल्हानसो प्रयत्न करीत सां. सहकार्य सगळेंचा हवां. हेत माजो काहीही फायदो नाय. से तां फक्त समाधान, मानसिक समाधान.
चित्पावनी बोली, ह्याचा दुसरा नाव ‘क्यें कितां’. ही बोली लुप्त हत से. तेला कारणां खूप सत. एक – ही बोली आयकोनी लोक चाळयसत. दुसरा – लाज दिस्से. तिसरा – मराठी भाषिक सुनो घरात आयल्यो. चौथा – ही बोली बोलणेतली उदासीनता. पांचवा – आपल्या बोलीचो आदर नाय. असे अनेक कारणांसाठी ही बोली नामशेष हैवेचे मार्गावर से. ही आमची बोली से. एतां तुमला सविस्तर माहिती देसा, ती अशी…
चित्पावनी बोली ही कोकणस्थ ब्राह्मणांची बोली से. रत्नागिरी जिल्हेत कोकणस्थ ब्राह्मणांचां मूळ सापडसे. त्याहांथीन स्थलांतर होवनी आज गोवा अणी दक्षिण कन्नड भागा पर्यंत चित्पावनी बोलणारे भाषीक गटागटान मिळसत. तशीच ही बोली कासारगोड पर्यंत बोलली जासे.
खास करनी गोवेतले सत्तरी तालुक्येंत जास्तशी कुटुंबा ही बोली बोलसत. तसांच दक्षिण कन्नड जिल्हेत ही बोली बोलणारी कुटुंबां जास्त प्रमाणात मिळसत. अणी ती कासारगोड पर्यंत विखुरली सत. महाराष्ट्राचे रत्नागिरी हे जिल्हेत ह्या बोलीचो जन्म जालो पण त्याहां चित्पावनी बोली बोल्ली जात नाय. रत्नागिरी जिल्हेत कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबा सौनी चित्पावनी बोली नामशेष जाली से.
रत्नागिरी जिल्हेत्थीन तीनशे ते साडेतीनशे वर्खापाठी, उदरनिर्वाहासाठी ब्राह्मण कुटुंबांनी स्थलांतर केला सैवां असा अभ्यासाअंती दिसोनी येसे. स्थलांतर करनी चित्पावन समाज दक्षिण कन्नडा पर्यंत स्थायिक झालेलो से. तसाच जगभर पसरलेलो आढळसे. चित्पावन मंडळी म्हणजेच सध्या कोकणस्थ बाह्मण म्हणी ओळखले जासत. तेंची परस्परांशी व्यवहार करेची बोली म्हणजेच चित्पावनी बोली, असा ढोबळ मनान म्हणता येल. चित्पावनी असां नाव या बोलीला केडला प्राप्त जालां हो संशोधनाचो विषय से.
जुने मध्यम कालीन महाराष्ट्रीय भाषाचां विकसीत रूप म्हणजे चित्पावनी बोली विकसित जाली सैवी. ही बोली मुलत: प्राकृत भाषात्थीन निर्माण जाली सौनी आजपर्यंत आपलां जुनां रूप राखनी से, असां एक मत से. डॉ. वासुदेव केतकर हेंचे मताप्रमाण यादवकालीन १८वे शतकातल्या मराठी भाषाचे दोन भाग म्हणजे कोकणी अणी चित्पावनी. चित्पावनी बोलीचां कोकणी बोलशी, दोनय बोली एकच म्हणेवां असां साम्य नाय. पश्चिम किनारेवर मराठीच्यो खुपश्यो बोली बोलल्यो जासत, तेपैकी चित्पावनी बोली ही एक से. चिपळूण हे चित्पावनांचां आध्य अणी मूळ स्थान मानलां जासे. मात्र हे तालुक्यातले लोकांना चित्पावनीचो गंधही नाय. हो खेद से. चित्पावनी बोली बोलणारी कुटुंबां जयगडच्या दक्षिणापाश्णी ते गोमंतका पर्यंत, तसांच पुढां ऊत्तर अणी दक्षिण कर्नाटका पर्यंत सत. चित्पावनांचे स्थलांतरामुळां या बोलीवर तेगडाच्या प्रादेशिक भाषाचो प्रभाव ठळकपणांन जाणवसे.
१. कोकणातल्या चित्पिवनीवर मराठी अणी मालवणीचा प्रभाव जाणवसे, पण कोकणात ही बोली लोप/सोपली पावली से. एकदम वयस्क/जांण्टेनाच ही बोली अवगत से, किंवा आईकलेली से. ह्या बोलीसाठी देवनागरी लिपीचो ऊपयोग करसत.
२. गोवेतल्या चित्पिवनीवर पोर्तुगीज अणी कोकणीचो प्रभाव जाणवसे. एठाही देवनागरी लिपीचो ऊपयोग ह्या बोलीसाठी करसत. गोवेतले सत्तरी तालुक्येत 90% कुटुंबां चित्पावनी बोली बोलसत. बाकीचे गोवेत हे प्रमाण कमी से. सध्या एठाची तरुण पिढी चित्पावनीचो उल्लेख करे उदासीन दिस्से.
३. उत्तर कर्नाटकात चित्पावनी वर कानडी भाषेचो प्रभाव से. त्याहां ह्या बोलीसाठी कन्नड लिपीचो उपयोग करसत.
४. दक्षिण कर्नाटकात चित्पिवनीवर कानडी अणी तुळु भाषाचो प्रभाव से. त्याहांपण कन्नड लिपीचो उपयोग लिहेसाठी करसत.
हे वरथीन चित्पावनी बोलीची व्यापकता दिसोनी येसे. कोकणातली चित्पावनी कालोत्घात लोप/सोपली से. तशी ती सगळेच प्रांतातथीन लोप पावो नये, जिवंत ऊरेवी म्हणी साहित्य निर्मिती हैवेची गरजेचे से.
चित्पावनी बोलीत साहित्य निर्मिती जाली नतली तरी संशोधनात्मक मराठी पुस्तका प्रकाशित जाली सत.
नारायण गोविंद चाफेकर – हेंचेनी समाज शास्त्रीय अणी इतिहासीक अभ्यास करनी “चित्पावन ” हे नावाचां पुस्तक शके १८६० मध्यां प्रकाशित केलां. तसांच इतिहासकार श्री राजावडे, इरावती कर्वे, लिंडा कोक्स हे लेखक संशोधकांनी चित्पावनीचो समाजशास्त्रीय अभ्यास केलो पण पुस्तकां प्रकाशित जाली नाय.
डॉ. वसुधा भिडे ह्यांनी ” A descriptive study of chitpaavni, a dialect of marathi ” हे विषयावर पुणे विद्यापीठात शोधप्रबंध सादर केलो सलो. तेसाठी त्याला 1983 सालांत पुणे विद्यापीठान पीएचडी प्रदान केली. तेंच्या डॉक्टरेट थिसिसवर आधारित ” चित्पावन आणि चित्पावनी ” हे पुस्तक त्यांणी 2013 सालांत प्रकाशित केलां.
श्री. के . जी. साठे हेंचेनी ” चित्पावनी हे नावान 1938 सालांत भाषा शास्त्रीय विश्लेषण करणारां पुस्तक प्रकाशित केलां
गोवेतले लेखक, खास करनी सत्तरीचे सुपुत्र, पं. महादेवशास्त्री जोशी हेंचेनी आपले आत्मचरित्र हे पुस्तकात्थीन चित्पावनी संवाद अधोरेखित केले सत. ह. मो. मराठे हेंचेनी आपले ‘बालकांड’ हे पुस्तकात चित्पावनी संवादांचो समावेश केलो से.
श्री. श्रीधर केशव बर्वे हेंचेनी ” सुलभ चित्पावनी ” चित्पावनी भाषा मार्गदर्शक, हे नावाची पुस्तीका प्रकाशित केली से. तसांच ” निबरातली सावळी ” हे चित्पावनी नाटक ल्हीवनी सादर केलां से.
हेंचे पावलावर पाउल थेवीत, साहित्यात भर घालेचो में एक ल्हानसो प्रयत्न केलो से.
१. ” खडतर जिणां ” हे एक पुर्ण चित्पावनी बोलीत्थीन ललित लेखांचां एक पुस्तक 2017 सालांत प्रकाशित केलां से.
२. ” काळजातले कुकारे ” हे एक पुर्ण चित्पावनी पुस्तक नोव्हेंबर 2020 मध्यां प्रकाशित केलां से.
३. “अभ्यास चित्पावनी बोलीचा ” हे चित्पावनी मार्गदर्शक पुस्तक अक्टोंबर 2021 मध्यां प्रकाशित केलां से.
४. ” ना घर ना दार ” हे चित्पावनी नाटक ल्हिवनी, पुर्ण केलां अणी फेब्रुवारी 2021 मध्यां श्री योगेश्वरी देवीचे चरणाकडा नाट्यप्रयोग सादर केलो.
५. ” आमचे आमी ” व्यक्तीचित्र संग्रह, हे पूर्ण चित्पावनी पुस्तक डिसेंबर 2022 मध्यां प्रकाशीत केला.
६. चित्पावनी शब्दकोष, लघुकथा, कविता ही पुस्तकां प्रकाशनाच्या वाटावर सत.
चित्पावनीतथीन साहित्याचे सगळे प्रकार हाताळणेचा मानस से. ललित लेख, मार्गदर्शक, नाट्यलेखन, व्यक्तिचित्र संग्रह असां स्वरूप पूर्ण केलां से. चित्पावनी शब्दकोष, व लघुकथा लेखन चालू से. तसांच चित्पावनी कविता संग्रह करेचो मानस से. कादंबरी लेखन ही पण एक मनातली तळमळ से. एक चित्पावनी दस्तऐवज तयार करेचा बळ मिळो हीच इच्छा अणी हीच प्रार्थना.
तर मित्रांनो अणी साहित्य प्रेमीनो, चित्पावनी साहित्य निर्मिती, अणी चित्पावनीचो प्रचार अणि प्रसार हैवो होच मनाचो ध्यास से. तुमचो प्रतिसाद लाभणार अशी खात्री से.
सगळेत शेवटी, प्रत्येकाला एक आव्हान से……
काडी पेटयली से,
त्याची चूड करणां आपले हातात से….
एकारत पेटयली से,
त्याची पंचारत करणां आपले हातात से…..
फक्त किटळ उडयलां से,
तेचां नक्षत्र करणां आपले हातात से….
दिवो लायलो से,
उजेड आपण पसरवेचो से…..
सूत्र सोडलां से,
सूत्रधार आपण हयवेचां से…..
फक्त एक दोळो उघडलो से,
आपण त्रिनेत्र हैवेचां से……