माजां घर जुनां घर

भांगरभूंय | प्रतिनिधी

एक म्हण से की, ‘जेचां मागीलदार स्वच्छ ,तेचां घरदार स्वच्छ.’ तसां आमचां मागीलदार. खरी जर घराची शोभा म्हणजे पोरसू (फुलबाग/ परसबाग) बायलांचा भूषण, सौंदर्य फुलवेची जागा, हीच फुलबाग. सबंध घर बगनी समाधान हसे  तेपेक्षा जास्त अणी खरां समाधान हसे तां मागीलदारा.

असां म्हणसत की घर बांधणां म्हणजे जिवाला लागसे घरघर.

माजे आजेन बांधलेला जुना घर. घर बघितला जाले तेला बाबडेला तां घर बांदे घरघर लागलीच सैवी. जवळ जवळ 78 वर्सां पयलीची गजाल. घराचो एकूण खर्च पांचशे रुपये. अर्धे उधार अणी अर्धे पदरचे. पण तां पूर्ण हैसर नाकी नऊ आयली सैंवी, तां निराळाच. पण उधार घेतलेली रक्कम परतफेड करी पर्यंत कितां हालअपेष्ठा भोगल्यो सतील तां बाबडे आबाला अणी दादालाच खबर. पण घर म्हणजे घर. 

घर अगदी डौलदार अणि दिमाखदार. घर दुरर्थींन बघलेवर आनंद हसे, तेपेक्षा घरात पाऊल थेयतकच समाधान हसे तां व्यक्त करता येत नाय. लांबरुंद असा चौकाचा घर. अणि चारी बाजूनं चार भाळी. घराची उंची साधारण  अठरा ते वीस हात. लांबी पंचवीस हात. अणि रुंदी पंधरा हात. हे घराचे पारे कितके रुंद सतील हि कल्पना वाचणारेन आणि बघणारेंन केलेली बरी. भिंतीतली कंत्रेला बघितलेवर अंदाज येसे, तो नीराळोच,  खिडक्यो बघतकच रुंदी नक्की कळसे. पुढलां दार आणि पाठलां दार धाकतकच, भीतल्यावाटांन घालेचे आडांबे बगनी नवलच दिस्से. दारांना खिळ्यो नाय अणी जोडे नाय.  सगळी वात्यावरची कमाल. तशीच कारागिरांची कमाल. एवढे मोठे घराला खिडक्यो मात्र अगदी ल्हान. खिडक्यांना खुर लाकडाचे. समोरची पडवी उघडी.  पण उंच अणी धिप्पाड रेखीव खांब्ल्यौ.

सो.  खरो विषय सांगचो विषय सोडनी मे गणीतां बांधितच उरलो. तर विषय असो की, घराकडा जाताना वाट अगदी घसरणीची. नजर जरी वाटावर सली तरी, उंच उंच पोफळी माड असे डोलत ससत की ते तुजी नजर आपलेकडा आकृष्ठ करनी घेसत. अणि उंच नजर गेली तर समोरचे डोंगराची हिरवळ मनाला भुरळ घालसे. घरा लागी पावता पावता दिस्सत त्यो केळी. पोपई, उंच अशी आंबुली. तश्योच पोफळींची गळाभेट घेणाऱ्यो मिरवेली. विषय से घराचो अणी में निसर्ग वर्णन करू लागलो.

हा, तर घरा कडा पावतकच उजवे हाता उंच आणि रुंद असो वाडो (गोठो). मात्याचे रुंद अणि उंच पेगाव, वरती कोलवाचा शिवण. हे दृश्य बघतकच घराचो अंदाज येणा सहाजिक से.  पुढां पाऊल घालतकच  समोर लांब रुंद ऐसपैस खळां.   खळेचे मधोमध तुळस.   तुळस बगनी अंदाज येसे तो घरकुलाचे संस्कार, रीतिरिवाज, रूढी पद्धती अणि शिस्तीचो.   पाचसहा पायऱ्यो चडोनी जातकच समोर दिस्से ती अवाढव्य पडवी. मुख्य दाराचे आजूबाजूला शिंगाड्याची (हरणाची) शिंगा. पयली आबा अणि दादा हेच शिंगावर आपल्यो पैरणी लटकावीत सले. परत पाऊल भायेर काढिसर पैरणीना फाशी. कपडे पिशव्यो लावे भिंतीला  एका ओळीत खुट्यो सल्योच. खुट्यो म्हणजे भिंतीवर बसलेले जणू पोपटच.  पडव्याचे एका टोकाला  रुंद  असो बांक अणि दोन लाकडी खुर्च्यो.  दुसरे टोकाला कांबळी सुकवे परसो.  परसेचे एका वाटांन मिठाचा दोणं, तर दुसऱ्या वाटांन सालां घालेचां दोण. पहू कांडेची लाट अणी व्हाईन  अणी एक ल्हानशी चुल पण पडव्याची शोभा वाढवीत सली.

मुख्य दार ओलांडला की भलोमोठो चौक. चौक म्हणजे निरव शांतता अणि समाधान. चौकातथीन भितर गेलो की लांबलचक साल म्हणजेच माजघर. माजघरात देवघर. अणी ते काळातला प्रशस्थ असो डायनिंग हॉल म्णजेच माजघर. उजवे हाता रांधपाचा साल, तर दावे हाता बाळंतीणीची खोली वजा साल.  हेचे मध्यां एक चोर खोली.  ह्या चोर खोल्यात एक मोठो पेठारो.  पेठारो म्हणजे पैसो आडको, वस्ती थेव्वेची  पेठ. मुळात पैसो आडको नतलो तरी सोय सली हेच खरा. रांधपाचे सालात  जाताच, अन्नदाता सुखी भव हे शब्द ओठावर येणारच, इतक्यो मात्यांन सारयलेल्यो सुंदर सुबक चुली. चुलीचे एकावाटांन दह्याचो बुडकुलो थेव्वे शिकां तर दुसऱ्या वाटांन चमचे पळ्यो आडकावे मोठी आकडी.  सामान थेव्वे भिंतीतला कँत्रेल, भिंतीचे कोप्रेत बळाणो. अगदी भिंतीला टेकोनी ताकमेढ, ताकमेढीला लटकायलेली रवी सत सली. ही रवी खांदावर धरनी मारुतीची केलेली नक्कल विसरतग येत नाय. चुलींवर भिंतीला कोनाडां सलांच.  अशी कोनांडी प्रत्येक सालात सलीच. तशीच आयदणां थेव्वे भिंतीला घडवंची स्वयंपाक घराला उभारी देत सली. चुलींना तेकोनी एक ल्हान खिडकी सली. त्या खिडक्याचा नाव ‘आजीची खिडकी’ (या नावे एक स्वतंत्र लेख आहे तो वाचा).

जे घरात वारस जन्माला आयले, ती खोली अति महत्वाची. बाळंतिणीची खोली. काळेकुट्ट काळोखाची खोली. इतकी स्वच्छ अणी अप्रदूषित जागा. ह्याच खोल्यात रक्ताची नाती वाढत गेली, घराची भरभराट हात गेली. अगदी शेवटचो टप्पो म्हणजे मागील दार. हे दार ओलांडला की लांबलचक पडवी. मधोमध पाण्याची खोल बांव. बावीच्या दोनी बाजूला मान्नां (स्नानगृह). ही बांव म्हणजे ते काळातलो फ्रिज. बेळांचे पाटलेत खायवेची पानां, भाजी किंवा इतर सामान आठ आठ दिवस टिकत सलां. एक म्हण से की, ‘जेचां मागीलदार स्वच्छ ,तेचां घरदार स्वच्छ.’ तसां आमचां मागीलदार. खरी जर घराची शोभा म्हणजे पोरसू (फुलबाग/ परसबाग) बायलांचा भूषण, सौंदर्य फुलवेची जागा, हीच फुलबाग. सबंध घर बगनी समाधान हसे  तेपेक्षा जास्त अणी खरां समाधान हसे तां मागीलदारा.

जाणतेंना घरघर लागली तरी आमला मिळलां ऱ्हेव्वे एक प्रशस्थ सुख अणि  समाधान मिळणारा एकघर. असां से माजां घर.